आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथील संशोधन विभागामार्फत महाराष्ट्रातील विविध आदिवासी जमातीं विषयक संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. सदर प्रकल्पांमध्ये आदिवासींचा विकासासंदर्भातील अभ्यास, मानवशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक व आंतरसांस्कृतिक अभ्यास तसेच आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मुल्यमापनात्मक अभ्यास इ. विषयांचा समावेश होतो. याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने प्रस्तावित केलेले विविध प्रकल्पदेखील संशोधन विभागाकडून हाती घेतले जातात. आदिवासी संस्कृती व आदिवासी विकासाशी संबंधित अभ्यासांसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडून संशोधन अधिछात्रवृत्तीदेखील प्रदान केली जाते.
केंद्र सरकारद्वारे ठरविल्या गेलेल्या निकषांनुसार राज्यातील अनुसूचित जमातींच्या यादीत जातींचा अथवा जमातींचा समावेश करण्यासंदर्भात व राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या विविध निवेदनांसंदर्भात या विभागाकडून संदर्भसाहित्यातुन अभ्यास करुन अभिप्रायासह उत्तरे तयार केली जातात. याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती / जमाती आयोग, मुंबई यांचेकडून आलेल्या पत्रांना उत्तरे दिली जातात.